छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०९ ते १३ ऑक्टोबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४६ ते ७९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात १० व ११ ऑक्टोबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १३  ते १९ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

काढणी अवस्था

काढणीस तयार असलेली सोयाबीन पीकाची काढणी व मळणी करुन घ्यावी तसेच मळणीनंतर धान्यास ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

खरीप ज्वारी

काढणी अवस्था

खरीप ज्वारी पीकाची काढणी व मळणी करुन घ्यावी तसेच मळणीनंतर धांन्यास ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी झाल्यास रब्बी पीकांसाठी पेरणीपुर्व तयारी करुन घ्यावी.

बाजरी

काढणी अवस्था

बाजरी पीकाची काढणी व मळणी करुन घ्यावी तसेच मळणीनंतर धांन्यास ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी झाल्यास रब्बी पीकांसाठी पेरणीपुर्व तयारी करुन घ्यावी.

आद्रक

कंद धरणे अवस्‍था

मागील आठवड्यातील दमट व ढगाळ वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

हळद

कंद धरणे अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये करपा (पानावरील ठिपके) रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

हरभरा

वाणांची निवड बीजप्रक्रिया व पेरणी

कोरडवाहू हरभरा पिकाच्या पेरणीसाठी ५० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ४५ x १० किंवा ३० x १० सेमी जमीनिच्या प्रकारानुसार ओळीतील अंतर ठेवावे. पेरणीपूर्वी बियाण्‍यास थायरम ४ ग्रॅम प्रती किलो किंवा कार्बेन्‍डॅझिम २ ग्रॅम आणि द्रवरूप जैवीक खत १० मिलि प्रती किलो बियाणे  याप्रमाणात बिजप्रक्रीया करून पेरणी करुन घ्यावी. पिकास २५:५०:२५ याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. हरभरा लागवडीसाठी आकाश (बीडीएनजी-७९७), बीडीएनजी-७९८ (काबुली), जॅकी-९२१८, फुले विक्रम, विजय, दिग्विजय, विशाल आणि फुले जी-१२  या जाती निवडाव्‍यात.

जवस

वाणांची निवड व पेरणी

जवस पिकाच्या पेरणीसाठी १० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ३० x १५ सेमी ओळीतील अंतर ठेवावे. पिकास २५:२५:०० याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. जवस पेरणीसाठी एलएसएल-९३ या जातीची निवड करावी

बटाटा

वाणांची निवड

बटाटा पिकाच्या लागवडीकरिता कुफरी ज्योती, कुफरी चंद्रमुखी, कुफरी लवकर, कुफरी सिंदुरी या सुधारित वाणांची निवड करावी.

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

मोसंबी फळबागेमधे फळमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास गळ झालेली फळे वेचुन नष्‍ट करावीत तसेच फळमाशी करीता कामगंध सापळे (मिथाईल युजेनॉल) एकरी चार ते पाच याप्रमाणात लावावेत व मॅलाथिऑन ५० टक्‍के १० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मोसंबी फळांची काढणी केल्यानंतर प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत.

डाळिंब

काढणी अवस्था

किंचित वाढलेले तापमान व दमट वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी अझाडिरॅक्टिन ( १०,००० पीपीएम) ३० मिली किंवा असिटामॅप्रिड २० टक्के ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील आठवड्यातील किंचित वाढलेले तापमान व दमट वातावरणामुळे वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एससी ४ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम

रेशीम कीटकांना खाद्य देत असताना फांदया, तुती पाने पातळ एका थरात दयावे.जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन वेळा दयावे. रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामुळे बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.

पशुसंवर्धन

शेळ्यांच्या व वासरांच्या गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात. जेणेकरून जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा होऊन त्यांची चांगली वाढ होते.भूक वाढते, पचन क्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढुन दूध उत्पादनातही वाढ होते.तसेच अखाद्य वस्तू चाटणे, चघळणे यासारख्या वाईट सवयी बंद होतात.

इतर

रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे हरभरा पिकाची ३० सेमी अंतरावर चार ओळी किंवा ४५ सेमी अंतरावर तीन ओळी याप्रमाणे पेरणी करावी, त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments