छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०८ ते १२ फेब्रुवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते २०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४६ ते ७१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १२ ते १८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हवामान कोरडे राहुन आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरी ऐवढे तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

सुरु ऊस लागवड /फुटवे अवस्था ते कांडे धरणे

सुरु ऊस : सुरु ऊसाची लागवड १५ फेब्रूवारी पर्यंत पूर्ण करावी.तसेच मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे पूर्वहंगामी ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी १५ मीली किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एससी ०४ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रब्‍बी ज्‍वारी

दाणे भरणे अवस्‍था

पक्ष्यांपासून ज्वारी पिकाच्या कणसांचे संरक्षण करण्यासाठी (उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.

मका (रब्बी)

दाणे भरणे अवस्था

पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास पाणी व्यवस्थापन करावे.

करडई

दाणे भरणे अवस्था

----

गहू   

दाणे भरणे अवस्था

गहू पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच गहू पीकामध्ये उंदरांचा प्रादूर्भाव दिसून येत असुन उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतामध्ये ४-५ पिंजरे प्रती एकर लावावेत. तसेच १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गुळ व त्यामध्ये ३ ग्रॅम झिंक फॉस्फाईड टाकून त्याच्या गोळया कराव्यात व उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवाव्यात. जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. हे मेलेले उंदीर पुरून टाकावेत.

उन्हाळी बाजरी

वाणांची निवड/ पेरणी

उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत बीजप्रक्रिया करूनच करावी.पेरणीसाठी पीपीसी-६ (परभणी संपदा), एएचबी-१६६६(प्रतिभा), श्रद्धा, सबुरी, आयसीटीपी-८२०३, डब्ल्यूसीसी-७५ इत्यादी यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी.पेरणीसाठी ३-४ किलो बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ x १० सेमी ठेवावे. पेरतेवेळी ६०:३०:३० पैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश खतमात्रा द्यावी व अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.

कांदा

कंद वाढीची अवस्था

कांदा पिकामध्ये प्रमाणापेक्षा अधिक पाणी दिल्यामुळे होणारी कंदसड रोखण्यासाठी जैविक बुरशीनाशके (ट्रायकोडर्मा) १ लिटर प्रति एकर  किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

आंबा

मोहोर ते फळधारणा अवस्था

तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे आंबा फळबागेमध्ये फळगळ दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड (एनएए, ४.५ एसएल)  ५.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना व दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची असताना करावी. तसेच ५० टक्के झाडावर मोहरीच्या आकाराचे फळधारना झाल्यावर झाडाला पाणी देणे चालू करावे. तसेच आंबा बागेमध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी  इमिडाक्लोप्रिड २०-२५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.तसेच भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत वातावरणात बदल होत असल्यामुळे शेतक-यांनी जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकात अचानक बदल करु नये. तसेच जनावरांना संतूलित आहारासोबत स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी द्यावे, जेणेकरुन जनावरांचे बदलत्या हवामानानुसार आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल.

इतर

शेतकरी बांधवानी पिकांना, भाजीपाला पिकांना व फळबागांना पाणी व्यवस्थापन करत असताना शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतात पाणी साचुन राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी व्यवस्थापन करावे.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला