औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २४ ते २८ मे २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३८.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २६ ते ६९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. २८ मे ते ०३ जून २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

उन्हाळी मका

परिपक्वता ते काढणी अवस्था  

काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.

सोयाबीन

जमिनीची निवड

सोयाबीनची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीवर करता येते परंतु अतिशय हलकी जमीन पिकाच्या उत्पन्नावर परिणाम करते. सोयाबीन पिकासाठी आम्लयुक्त, क्षारयुक्त, वालुकामय चिकणमाती जमिनीमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करू नये. सोयाबीन पिकासाठी जास्त सेंद्रीय कर्ब असलेली मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ६.५ च्या आसपास असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक उत्तम येते .

खरीप ज्वारी

जमिनीची निवड

खरीप ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू  ५ .५  ते ८.४ असावा.

बाजरी

जमिनीची निवड

बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु हा ६.२ ते ७.७ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी - वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.

आद्रक

जमिनीची निवड

आद्रक पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, उत्तम निचऱ्याची भुसभुशीत जमीन निवडावी. या पिकासाठी किंचीत आम्लयुक्त सामू असलेली जमिन (सामू ६.५ ते ७) मानवते.

हळद

जमिनीची निवड

हळद पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, उत्तम निचऱ्याची भुसभुशीत जमीन निवडावी. या पीकासाठी जमीनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.

मोसंबी

जमिनीची निवड

मोसंबी या पिकासाठी मध्यम काळी, उत्तम निचऱ्याची, साधारणतः एक मीटर खोल असलेली जमीन चांगली असते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. चोपण व चुनखडीचा थर असलेल्या जमिनीत मोसंबीची लागवड करू नये. उपलब्ध चुन्याचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा जास्त असू नये. भारी काळ्या तसेच पाण्याचा निचरा योग्यप्रकारे न होणाऱ्या जमिनीत मोसंबीची लागवड करणे टाळावे. तसेच अंबिया बहार धरलेल्या बागेत सिंचन व्यवस्था करावी.  बोर्डो पेस्ट लावला नसल्यास लावून घ्यावा तसेच मोसंबी बागेत फळांमुळे खाली झुकलेल्या फाद्यांना बांबूच्या साहाय्याने आधार द्यावा.

डाळिंब

जमिनीची निवड व मृग बहार

डाळिंब पिकाच्या नवीन लागवडीसाठी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी (३ ते ५ %) उताराची जमीन निवडावी.पिकास हलकी परंतु सामू ७.५ असलेली जमीन योग्य असते.

मृग बहार घेण्याचे नियोजन असल्यास बाग ताणावर असताना मे महिन्याच्या शेवटी इथेफोन ३९ % एस एल ची फवारणी करून पानगळ करून घ्यावी व नंतर हलकी छाटणी करून घ्यावी.छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शेंड्याकडून १० ते १५ सेमी पर्यंत छाटाव्यात तसेच वाळलेल्या फांद्या छाटाव्यात व बागेत पडलेला काडीकचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

सध्यस्थितीत भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी व पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच भाजीपाला पिकाची काढणी शक्यतो सकाळी व सायंकाळच्या वेळेस करावी. तसेच मिरची पिकामध्ये पांढ-या माशीच्या प्रादुर्भाव दिसून येत सुन याच्या व्यवस्थापनासाठी फेन्प्रोपॅथ्रीन ३० ईसी ३.५ मिली किंवा पायरीप्रॉक्झीफेन १० टक्के ईसी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम

लागवड पुर्व तयारी

उन्हाळ्यात शक्यतो पट्टा पद्धत तुती लागवडीत शेंद्रीय पदार्थाचे किंवा पॉलिथिन आच्छादनाचा वापर करावा. शेंद्रीय आच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष, झाडांची पाने, उसाची पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील मळी याचा वापर करावा. पट्टा पद्धत तुती लागवडीत एकास आड एक पट्यात २ x २.५ x १.५ फूट आकाराची चर करून त्यात वरील शेंद्रीय पदार्थ भरावेत.

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत गाई, म्हशी व शेळ्या, मेंढ्याना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

इतर

शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील पीकांच्या लागवडीकरीता पुर्वमशागतीची कामे करुन घ्यावीत.तसेच शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना प्रखर सूर्य प्रकाश असताना दुपारच्या वेळेत काम करणे टाळावे.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला