छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २० ते २४ जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १२.० ते १३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते ११ किमी/ता६ राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २४ ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान हवामान कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

सुरु ऊस लागवड /खोडवा व्यवस्थापन

सुरु ऊस: सुरु ऊसाची लागवड १५ फेब्रूवारी पर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी जातिवंत बेण्याची निवड करावी. बेण्याचे वय १० ते ११ महिन्यांचे असावे. जमिनीची चांगली मशागत करून पट्टा पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे.

खोडवा व्यवस्थापन : शेतक-यांनी ऊस पाचट न जाळता,पाचट एक आड एक सरीत जमा करावे. पाचट जमा करतांना पट्टा पध्दतीत पाचटाचे आच्छादन करावे किंवा कुटी यंत्राच्या साह्याने पाचटाचे कुटी करावी त्यानंतर पाचटावर पाचट कुजविणारे जिवाणू १० किलो + शेणखत + युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट १०० किलो प्रति हेक्टर मिसळून टाकावे व बगला फोडाव्यात. तसेच बुडखे जमीनीलगत छाटावे व छाटलेल्या बुडख्यावर क्लोरोपायरीफॉस २० मिली + कार्बेन्डाझिम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा तसेच किडींचा प्रादुर्भाव रोखल्या जाईल.

रब्‍बी ज्‍वारी

कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्‍था

पक्ष्यांपासून ज्वारी पिकाच्या कणसांचे संरक्षण करण्यासाठी (उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.

करडई

बोंड धारणा ते दाणे भरणे अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व किमान तापमानात झालेल्या घटीमुळे करडई पिकावर बोंडया खाणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मका (रब्बी)

कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व किमान तापमानात झालेल्या घटीमुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम १२.६ टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी प्रति ५ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गहू   

फुटवे/ पोटरी अवस्था

मागील आठवड्यातील किमान तापमानात झालेल्या घटीमुळे गहू पिकामध्ये पोंगे मर (खोड किड) दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के २० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कांदा

कंद वाढीची अवस्था

कांदा पीकास पुर्नलागवड करुन ६० दिवस झाल्यास १३:००:४५ किंवा ००:००:५०  विद्राव्य खत १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावरील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १० मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

आंबा

फुलोरा ते फळधारणा अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे आंबा फळबागेमध्ये फळगळ वाढण्याची शक्यता असून हे टाळण्यासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड (एनएए, ४.५ एसएल)  ५.५  मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना व दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची असताना करावी. तसेच ५० टक्के झाडावर मोहरीच्या आकाराचे फळधारना झाल्यावर झाडाला पाणी देणे चालू करावे.

भाजीपाला

फुले ते फळधारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व किमान तापमानात झालेल्या घटीमुळे टोमॅटो पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम २५ डब्लूसी ४ मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के २० ‍मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुसंवर्धन

हवामानातील अचानक बदलामुळे कोंबडयांवर ताण येतो. त्यामुळे त्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व ब जीवनसत्वाचा वापर करावा जेणेकरुन ताण कमी होण्यास मदत होईल. 

इतर

शेतक-यांनी रब्बी हंगामातील पीकांना त्यांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत गरजेनुसार पाणीव्यवस्थापन करावे, जेणेकरुन ओलाव्यामुळे जमीनीतील अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होवून ताण कमी राहिल्याने किडींचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व उत्पन्नात वाढ होते.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला