छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० जुलै २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून विखुरलेल्या प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७० ते ९१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २५ जुलै २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम तसेच दि. २६ जुलै २०२५ रोजी जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ३० जुलै ते ०५ ऑगष्ट २०२५ दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.

 कृषि हवामान सल्ला

ऊस

लागवड/ वाढीची अवस्था

आडसाली ऊस पिकाची लागवड बेणे प्रक्रिया करून करावी. तसेच बऱ्याच ठिकाणी ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम निसोप्ली या उपयुक्त बुरशीचा ०४ किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. तसेच फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रीड ४० टक्के ०४ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

कापूस

वाढीची अवस्था

मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ८ ते १० पिवळे व निळे चिकट सापळे प्रति एकर प्रमाणात लावावेत. तसेच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास सीटामिप्रीड २० टक्के ३० ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के ४० ग्रॅम किंवा फलोनिकॅनीड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर स्वच्छ वातावरणात पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.

का

वाढीची अवस्था

मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव ओळखन्यासाठी एकरी २० कामगंध सापळे लावावेत. तसेच प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. फवारणी करत असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

तूर

वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी किंवा थायामेथोक्साम २५ टक्के डब्ल्युजी  ४ - ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

मूग/उडीद

वाढीची अवस्था

मागील ढगाळ वातावरणामुळे मुग/उडीद पिकावर पाने खाना-या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी ३० मिली किंवा थायोडिकार्ब ७५ डब्ल्यू. पी. १.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.

सिताफळ

कळी ते फळधारणा अवस्था

सिताफळ बागेत तण व्यवस्थापन करावे. तसेच फळांच्या वाढीसाठी १९:१९:१९ विद्राव्य खत ३ किलो प्रति एकर ड्रीपव्दारे  किंवा पाण्यात मिसळून आळवणी करावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी १५ मिली किंवा पायरिप्रॉक्झीफेन ५ ईसी + फेनप्रोपॅथ्रीन १५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत मावा या विषाणूजन्य आजारापासुन शेळया व मेंढयाचे संरक्षण करण्याकरीता त्याच्या तोंड व ओठांवरील जखमा सकाळी व सायंकाळी पोटॅशियम परमॅग्नेटने धुवून साफ कराव्यात व जखमांवर हळद, लोणी किंवा दुधाची साय यासारखे मऊ पदार्थ लावावेत. यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात. तसेच खादयामध्ये मऊ, लुसलुसीत चारा, कोथींबीर, मेथी घास याचा समावेश करावा.

इतर

सर्व शेतकरी बांधवांनी शेतामधील फवारणी व आंतरमशागतीची कामे पुढील दोन दिवस पुढे ढकलावीत तसेच पीकांमध्ये व फळबागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा करावा.

सर्व शेतकरी बांधवांकरीता त्यांच्या शेतातील पीकांवरील बुरशींचे तसेच पीकातील खत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक बुरशीनाशके (बायोमिक्स) व जैविक खते (बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकरीता उपलब्ध आहेत.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

 

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला