छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २१ ते २५ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशतःढगाळ ते ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३९ ते ८५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ० ते ० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २५ ते ३१ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

काढणी अवस्था

काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पीकाची काढणी करून योग्य वाळलेल्या पिकाची मळणी करुन घ्यावी. तसेच मळणीनंतर धान्यास ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी झाल्यास रब्बी पीकांसाठी पेरणीपुर्व तयारी करुन घ्यावी.

बाजरी

काढणी अवस्था

बाजरी पीकाची काढणी व मळणी करुन घ्यावी तसेच मळणीनंतर धांन्यास ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी झाल्यास रब्बी पीकांसाठी पेरणीपुर्व तयारी करुन घ्यावी.

आद्रक

कंद वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील किंचित वाढलेले तापमान व दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १० ग्रॅम व स्ट्रॅप्टोसायकलीन १-२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

हळद

कंद वाढीची अवस्‍था

मागील काही दिवसांमधील किंचित वाढलेले तापमान व दमट वातावरणामुळे हळद पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

हरभरा

बीजप्रक्रिया व पेरणी

कोरडवाहू हरभरा पिकाच्या पेरणीसाठी ५० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ४५ x १० किंवा ३० x १० सेमी जमीनिच्या प्रकारानुसार ओळीतील अंतर ठेवावे. पेरणीपूर्वी बियाण्‍यास थायरम ४ ग्रॅम प्रती किलो किंवा कार्बेन्‍डॅझिम २ ग्रॅम आणि द्रवरूप जैवीक खत १० मिलि प्रती किलो बियाणे  याप्रमाणात बिजप्रक्रीया करून पेरणी करुन घ्यावी. पिकास २५:५०:२५ याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.

जवस

पेरणी

जवस पिकाच्या पेरणीसाठी १० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ३० x १५ सेमी ओळीतील अंतर ठेवावे. पिकास २५:२५:०० याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी.

बटाटा

बेणे निवड

लागवडीसाठी फक्त प्रमाणित अथवा सत्यप्रत व निरोगी बियाणे वापरावे.खरीप हंगामातील बटाटा ताबडतोब रब्बी हंगामातील लागवडीसाठी वापरू नये, कारण जवळ जवळ तीन महिने बटाटा सुप्त अवस्थेत असतो. शीतगृहातून बटाटे बाहेर काढल्यानंतर ७ - २० दिवस सावलीत विरळ पसरून ठेवावेत. या कालावधीत बटाट्यांना मोड आलेले असावेत अथवा डोळे फुगलेले असावेत. मोड न आलेले किंवा अधिक सुकलेले बटाटे लागवडीस वापरू नयेत. बटाटा बेणे हे कीड व रोगमुक्त असावे लागवडीसाठी वापरावयाचे बटाटे बेणे हे  २५ ते ३० ग्रॅम वजनाचे, पाच सें.मी. व्यासाचे, संपूर्ण (न कापलेले) साधारणतः अंड्याच्या आकाराचे असावे.

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

मोसंबी फळबागेमधे फळमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास गळ झालेली फळे वेचुन नष्‍ट करावीत तसेच फळमाशी करीता कामगंध सापळे (मिथाईल युजेनॉल) एकरी चार ते पाच याप्रमाणात लावावेत व मॅलाथिऑन ५० टक्‍के १० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मोसंबी फळांची काढणी केल्यानंतर प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत. तसेच मोसंबी बागेस पाणी व्यवस्थापन करावे.

डाळिंब

फळ वाढीची अवस्‍था

किंचित वाढलेले तापमान व दमट वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी अझाडिरॅक्टिन ( १०,००० पीपीएम) ३० मिली किंवा असिटामॅप्रिड २० टक्के ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच डाळिंब बागेस पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

किंचित वाढलेले तापमान व दमट वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाच्या प्रादुर्भाव दिसुन येत असून याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम

रेशीम कीटकांना खाद्य देत असताना फांदया, तुती पाने पातळ एका थरात दयावे.जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन वेळा दयावे.रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामुळे बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.

पशुसंवर्धन

शेळ्यांच्या व वासरांच्या गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात. जेणेकरून जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा होऊन त्यांची चांगली वाढ होते.भूक वाढते, पचन क्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढुन दूध उत्पादनातही वाढ होते.तसेच अखाद्य वस्तू चाटणे, चघळणे यासारख्या वाईट सवयी बंद होतात.

इतर

रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे हरभरा पिकाची ३० सेमी अंतरावर चार ओळी किंवा ४५ सेमी अंतरावर तीन ओळी याप्रमाणे पेरणी करावी, त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला