छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०८ ते १२ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४९ ते ७७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. ०७ ऑक्टोंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १२ ते १८ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान सरासरी ऐवढे तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

परिपक्वता ते काढणी अवस्था

काढणीस तयार असलेली सोयाबीन पीकाची काढणी व मळणी करुन घ्यावी तसेच मळणीनंतर धान्यास ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

बाजरी

परिपक्वता अवस्था

पक्षांपासुन बाजरी पिकाच्या कणसाचे संरक्षण करण्याकरिता ( उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.

आद्रक

कंदवाढीची अवस्‍था

मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे आद्रक पीकामध्ये पानावरील ठिपके, करपा आणि कंदसडीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी किंवा एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीकोनॅझोल २५ टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

हळद

कंदवाढीची अवस्‍था

मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे हळद पीकामध्ये पानावरील ठिपके, करपा आणि  कंदसडीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी किंवा एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीकोनॅझोल २५ टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

हरभरा

जमिनीची निवड

हरभरा पिकाच्या पेरणीसाठी मध्‍यम ते भारी, पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्‍ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी साठवून ठेवणा-या जमिनीत लागवड केल्‍यास हे पीक उमळते.

जवस

जमिनीची निवड

जवस पीकाच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी जमीनीची निवड करावी.

बटाटा

जमीनीची ‍निवड

बटाटा लागवडीकरिता मध्यम प्रतीची,मिश्रित पोयट्याची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन जास्त चांगली असते. भारी,चिकण वा पाणथळ जमिनीची निवड करू नये.कारण या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून लागवड केलेला बटाटा किंवा बटाट्याच्या फोडी (बियाणे) लागवडीनंतर ताबडतोब कुजणे किंवा सडण्याची शक्‍यता असते. त्यामुळे बटाट्याची उगवण अतिशय कमी होते.

मोसंबी

काढणी अवस्‍था

मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे मोसंबी बागेमध्ये फळांवरील डासांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असुन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बागेतील गळ झालेली फळे वेचून नष्ट करावीत तसेच डासांचे पतंग बुडुन मरण्यासाठी ५ लीटर पाण्यामध्ये २५० ग्रॅम गुळ + १० मिली क्लोरोपायरीफॉस किंवा क्विनॉलफॉस + २-३ पडलेल्या मोसंबी फळांचा रस यांचे द्रावण तयार करुन बागेमध्ये ५ ते ६ ठिकाणी ठेवावे. त्याचबरोबर सायंकाळी ६ ते ७ या वेळेस बागेमध्ये पश्चिमेला धुर करावा.

डाळिंब

वाढीची अवस्‍था

मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे डाळिंब बागेत रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६ टक्के ओडी ७.५ मिली किंवा फ्लॉनिकॅमिड ५० टक्के डब्ल्यूजी ७.५ ते १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फळ धारणा ते फळवाढीची अवस्था

मागील आठवडयातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे भाजीपाला पीकावर (टोमॅटो) करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड ( ५०टक्के डब्लूपी) किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

रेशीम कीटकांना खाद्य देत असताना फांदया, तुती पाने पातळ एका थरात दयावे. जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन वेळा दयावे. रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामुळे बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत शेळया व करडयांमध्ये सर्दीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याकरीता बकेट किंवा पातेल्यात १ ते २ लीटर पाण्यात जिंदातिलीस्मात किंवा निलगीरी तेलाचे १० ते १२ थेंब टाकून गरम पाण्याची वाफ पशुधनास द्यावी. सर्दीचा त्रास अधिक असल्यास त्वरीत पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. तसेच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पशुधनास जंतनाशकाचे लसीकरण करुन घ्यावे.

इतर

परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स जैविक बुरशीनाशक व कीडनाशक तसेच जैविक संघ (NPK) कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीस उपलब्ध आहे.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला