छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०५ ते ०९ नोव्हेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषीहवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहून दिनांक ०५ व ०६ नोव्हेंबर २०२५ तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७४ ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०९ ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

आद्रक

कंद वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता आद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १० ग्रॅम व स्ट्रॅप्टोसायकलीन १-२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

हळद

कंद वाढीची अवस्‍था

मागील काही दिवसांमधील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता हळद पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

हरभरा

पेरणी

बागायती हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. हरभरा पिकामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा + मोहरी ( २:१ ), हरभरा + करडई ( २:१) तसेच हरभरा + ज्वारी ( ६:२ ) घेता येतात.

जवस

पेरणी

शेतकरी बांधवांनी १५ नोव्हेंबर पर्यंत बागायती जवस पिकाची पेरणी करून घ्यावी. पेरणीसाठी २५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ३० X १५ सेमी ओळीतील अंतर ठेवावे.

बटाटा

बेणेप्रक्रीया व लागवड

बटाटा पिकाची ६० X ३०  सें. मी. अंतर ठेवुन वरंबा पध्दतीने लागवड करावी. लागवडीसाठी ३० ते ४० ग्रॅम वजनाचे २० ते २५ क्विंटल बटाटे प्रतिहेक्टरी वापरावेत. तसेच लागवडीपुर्वी बेणे प्रक्रियेसाठी २५ ग्रॅम कार्बेन्डेझिम व रसशोषण करणार्‍या किडींसाठी इमिडॅक्लोप्रिड २०० एस एल चे द्रावण करुन त्यामध्ये बेणे बुडवावेत. त्यानंतर ५०० मिली द्रवरूप अ‍ॅझेटोबॅक्टर चे द्रावण तयार करुन बेणे १५ मिनिटे बुडवून अशा प्रकारे बीजप्रक्रिया केल्यानंतर बेणे थंड, हवेशीर ठिकाणी पसरून ठेवावेत. त्यानंतरच लागवडीसाठी  वापरावेत.

मोसंबी

वाढीची अवस्था

नवीन लागवड केलेल्या मोसंबी रोपांमध्ये जमिनीलगत अतिओलाव्यामुळे फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊन रोपांची पाने पीवळी पडुन गळत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी खोडालगत ५ ते १० सेमी पर्यंत माती लावुन लगेच कॉपर ऑक्झीक्लोराईड या बुरशीनाशकाची २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून ८ दिवसाच्या अंतराने दोन वेळा आळवणी करावी. मोसंबी फळझाडांना बोर्डो मिश्रण लावुन घ्यावे.

डाळिंब

बहार व्यवस्थापन

डाळिंब बागेचा ताण तोडताना प्रत्येक झाडाला १५ ते २० किलो शेणखत किंवा १० ते १५ किलो शेणखत + २ किलो गांडुळखत + २ किलो निंबोळी पेंड टाकावी. डाळींब बागेतील तणव्यवस्थापन करावे.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

सध्यस्थितीमध्ये तापमानातील चढउतारमूळे टोमॅटो पीकामध्ये करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के किंवा क्लोरोथॅलोनील ७५ टक्के २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा ) किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम

तुती रेशीम झाडांची ७० दिवसाच्या अंतराने वर्षाकाठी ५ वेळा तुतीची छाटणी करावी. प्रत्येक ४५ दिवसाच्या अंतराने फांद्या छाटणी करावी.

पशुसंवर्धन

शेळ्यांच्या व वासरांच्या गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात. जेणेकरून जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा होऊन त्यांची चांगली वाढ होते. भूक वाढते, पचन क्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढुन दूध उत्पादनातही वाढ होते. तसेच अखाद्य वस्तू चाटणे, चघळणे यासारख्या वाईट सवयी बंद होतात.

इतर

शेतकरी बांधवांनी हरभरा पीकाच्या पेरणीकरीता रुंद सरी वरंबा यंत्राचा उपयोग करावा व हरभरा पिकाची ३० सेमी अंतरावर चार ओळी किंवा ४५ सेमी अंतरावर तीन ओळी याप्रमाणे पेरणी करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला