औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०२ ते ०६ ऑगष्ट २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. ०२ व ०३ ऑगष्ट २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात तर दि. ०४ ते ०६ ऑगष्ट २०२३ तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते २८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ८० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २७ ते ३० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. ०३ ऑगष्ट २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. ०६ ते १२ ऑगष्ट २०२३ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

सोयाबीन

वाढीची अवस्था

सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता असल्यास तण नियंत्रणासाठी पीक १५ ते २० दिवसाचे झाले असल्यास इमॅझेथायपर ३५ % + इमाझामॉक्स ३५ % डब्ल्यूजी २ ग्रॅम किंवा क्लोमॅझोन ५० % ईसी ३० ते ४० मिली या तणनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन व जमिनीत ओलावा असताना फवारणी करावी.

खरीप ज्वारी

वाढीची अवस्था

खरीप ज्वारी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाची कामे करून घ्यावीत. तसेच खरीप ज्वारी पीकास पेरणीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता ४० किलो प्रति हेक्टरी युरियाव्दारे दयावा.

बाजरी

वाढीची अवस्था

बाजरी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाची कामे करून घ्यावीत. तसेच बाजरी पीकास पेरणीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता हलक्या जमिनीत २० किलो तर भारी जमिनीत ३० किलो प्रति हेक्टरी युरियाव्दारे दयावा.

खरीप भुईमूग 

वाढीची अवस्था

खरीप भुईमूग पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे कामे स्वच्छ वातावरण व शेतात वापसा असताना करून घ्यावीत. तसेच मागील आठवड्यातील ढगाळ हवामान व रिमझिम पाऊस असल्यामुळे भुईमूग पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

आद्रक

वाढीची अवस्‍था

आद्रक पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी. तसेच आद्रक पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन रोपे पिवळी पडत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी. 

हळद

वाढीची अवस्‍था

हळद पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे. तसेच हळद पिकामध्ये माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित व प्रमाणशीर योग्य वेळेस वापर करावा. माती परीक्षण केलेली नसल्यास ६ आठवडे झालेल्या पिकास नत्राचा शिफारसीत दुसरा हप्ता शेतात वापसा असताना देऊन बेडला हलकी भर द्यावी.   

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोसंबी फळबागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होण्याची शक्यता असते, यासाठी प्रतीबंधात्मक उपाय म्हणुन कार्बेनडेझीम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.तसेच मोसंबी बागेमध्ये लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल १८.५ ईसी २७ मिली किंवा डायफेनथ्युरॉन ५० डब्ल्यू.पी. २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

डाळिंब

फळ फळ वाढ ते काढणी अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ हवामान तसेच वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे डाळिंब बागेत तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन किंवा ब्रॉनोपॉल ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर नाग अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी सायनॅन्ट्रीनिलिप्रॉल १०.२६. % ओडी १८ मिली किंवा थायमिथॉक्झाम २५ % डब्ल्यूपी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

सध्यस्थितीत रेशीम शेतकऱ्यांनी, तुती पाने खादय पातळ एका थरात दयावे. जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन वेळा दयावे. रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामळे बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.कीटक कातेवरून बाहेर पडते वेळी अर्धा तास अगोदर विजेता निर्जंतुक पावडर बरोबर डायथेन एम-४५ बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति किल्लो मिसळून रॅकवर धुरळणी करावी. पाऊस चालू असेल तर फांदया खाऊ घालण्या अगोदर अर्धा ते एक तास पानावरील पाणी निचरून जाऊ दयावे व नंतर अळयांना खादय दयावे.

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत जनावरांमध्ये गोचीड, रक्त पिपासूं यासारख्या किडी दिसून येत आहेत याच्या निर्मूलनासाठी वनस्पतीजन्य किटकनाशके जसे १० मिली  निमतेल + १० मिली करंजतेल + २० ग्रॅम अंगाला लावण्याचा साबणाचा चुरा १ लिटर पाण्यात मिश्रण तयार करून २ तास भिजत ठेवून हे द्रावण जनावरांच्या शरीरावर तसेच गोठ्यात फवारून घ्यावे.

इतर

तणनाशकांची फवारणी करत असताना जमिनीत ओलावा तसेच वापसा बघून करावी. तणनाशकाची फवारणी जोराचे वारे व पाऊस चालू असताना करू नये तसेच २-३ तास सूर्यप्रकाश राहील हे पाहूनच फवारणी करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला