छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १७ ते २१ जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९.० ते ११.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २४ ते ७२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २१ ते २७ जानेवारी २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

आद्रक

परिपक्वता ते काढणी

आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित "ब्रश कटर'चा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्‍टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. काढणी केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी साठवणूक करावी.

हळद

परिपक्वता ते काढणी

हळद पिकाची काढणी जमिनीत योग्य ओलावा बघून करावी.कंद काढणीपूर्वी राहिलेली पाने जमिनीलगत कापून घ्यावीत.जर हळद पिकाची लागवड सरीवरंबा पद्धतीने केली असल्यास काढणी कुदळीच्या सहाय्याने करावी व लागवड गादीवाफ्यावर केली असल्यास काढणी यंत्राच्या सहाय्याने करावी.काढणी करत असताना गडयांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणी करताना जेठे गड्डे व हळकुंडे वेगळी करावीत व काढणीनंतर योग्य ठिकाणी साठवणूक करावी.

हरभरा

फांदया / फुलधारणा/ घाटे धरणे  

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकामध्ये फुलगळ होण्याची शक्यता आहे यासाठी युरिया २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच हरभरा पिकामध्ये घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी ५०T आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. प्रादूर्भाव दिसून येत असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे.

जवस

बोंड धरणे ते दाणे भरणे अवस्था

जवस पीकावरील गादमाशी अथवा पिलीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी निरिक्षण करावे. प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के १०  मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

बटाटा

कंद लागणे ते कंद वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ हवामान व तापमानातील चढउतारामुळे बटाटा पिकावर रसशोषण करणार्‍या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० टक्के) १५ मिली किंवा अ‍ॅसिटामीप्रीड २-३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पिवळ्या व निळया रंगाचे चिकट सापळे (छोट्या आकाराची) प्रत्येक ४-५ ओळींनंतर एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.   

मोसंबी

फुलधारणा अवस्था

मोसंबी बागेला पाणी व्यवस्थापन करताना झाडाच्या खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.तसेच मागील आठवड्यातील ढगाळ हवामान मोसंबी बागेमध्ये कोवळ्या पानावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के ईसी २० मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एसएल २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळिंब

फुलोरा अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ हवामान व तापमानातील चढउतारामुळे डाळिंब बागेत फुलगळ होत आहे याच्या व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलीक ऍसिटिक ऍसिड (एनएए) २ ते ३ मिली आणि ००:५२:३४ विद्राव्य खते ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून मिसळून फवारावे. डाळिंब बागेतील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

पुढील दोन दिवसामध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता असुन शेतकरी बांधवानी भाजीपाला पिकास मोकाट पद्धतीने पाणी द्यावे. भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पिकास पाणी द्यावे व काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. मागील आठवड्यामध्ये किमान तापमानात झालेल्या घटीमुळे भाजीपाला पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी पिकात निळ्या व पिवळ्या रंगाची चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.तसेच निंबोळी अर्काची फवारणी करावी.

तुती रेशीम

वाढीची अवस्था

तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपुल (गोदरेज) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून छाटणीनंतर १२ ते १५ दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे २०  टक्के उत्पादन वाढ ‍मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हीस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) २० मिली प्रति १० ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुस-या वर्षापासुन व्हि -१ जातीचे एकरी २५ टन पानाचे उत्पादन मिळते.   

पशुसंवर्धन

पुढील दोन दिवसामध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता असुन शेतकरी बांधवानी थंडीपासुन करण्याकरीता जनावरांना व शेळ्यांना उघड्यावर न बांधता शेडमध्ये बांधावेत. तसेच कुकुटपालन शेडमधील तापमान नियंत्रीत ठेवण्याकरीता इलेक्ट्रीक बल्ब लावावेत. तसेच शेतकरी बांधवांनी शेळया व मेंढयांना सकाळी उशीरा चरण्यासाठी सोडावे व सर्दी जाणवल्यास पशुवैदयकांच्या सल्ल्याने उपचार करावा.

इतर

शेतक-यांनी कापुस व तुर पिकांच्या काढणीनंतर रान तयार करुन पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला