छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १० ते १४ जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहून दि. १० व ११ जानेवारी २०२४ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० व ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३० ते ६३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १४ ते २० जानेवारी दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

आद्रक

परिपक्वता ते काढणी

काढणीस तयार असलेल्या आद्रक पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे. 

हळद

परिपक्वता ते काढणी

काढणीस तयार असलेल्या हळद पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे. 

हरभरा

फांदया ते फुलोरा अवस्था  

मागील आठवड्यातील ढगाळ हवामान व तापमानातील चढउतारामुळे हरभरा पीकामध्ये पिकावर करपा या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच हरभरा पिकामध्ये घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी ५० T आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. प्रादूर्भाव दिसून येत असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे.

जवस

फुलोरा  ते बोंड धरणे अवस्था

जवस पीकावरील गादमाशी अथवा पिलीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी निरिक्षण करावे. प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के १०  मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

बटाटा

कंद लागणे ते कंद वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ हवामान व तापमानातील चढउतारामुळे बटाटा पिकावर रसशोषण करणार्‍या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० टक्के) १५ मिली किंवा अ‍ॅसिटामीप्रीड २-३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पिवळ्या व निळया रंगाचे चिकट सापळे (छोट्या आकाराची) प्रत्येक ४-५ ओळींनंतर एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.   

मोसंबी

आंबिया बहार व्यवस्थापन

 

मोसंबी बागेतील ४० टक्के पानगळ होणे, पाने गोलाकार होणे ही व्यवस्थित ताण बसण्याची लक्षणे असुन, ताण तोडतांना शेतक-यानी झाडांच्या वयानुसार हळूहळू बागेस पाणी देण्यास सुरवात करावी व १ ग्रॅम जिब्रॅलीक आम्ल + १ किलो युरिया  प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी यामुळे बहार चांगला येण्यास मदत होते. ताण तोडतांना हलक्‍या ओलिता अगोदर बागेस शिफारशीत खत मात्रा द्यावी. (५ ते ७ वर्षे वयोगटातील झाडांना ३५० ग्रॅम नत्र, १५० ग्रॅम स्फुरद, १५० ग्रॅम पालाश, ८ ते १० वयोगटातील झाडांना ४०० ग्रॅम नत्र, २०० गॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाश तर १० ते पुढील वयोगटातील झाडांना ५०० ग्रॅम नत्र, २५० स्फुरद, २५० पालाश याप्रमाणे खतमात्रा दयावी.)

डाळिंब

बहार व्यवस्थापन

डाळिंब बागेस योग्य ताण बसल्यास ताण तोडताना शिफारशीत ३०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्‍फुरद, २५० ग्रॅम पालाश प्रती झाड खत मात्रा देऊन बागेस हलके पाणी दयावे.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पीकामध्ये करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के किंवा क्लोरोथॅलोनील ७५ टक्के २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा ) किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

रेशीम कोषाच्या प्रत्येक पीकामध्ये १५ ते २० टक्के पर्यंत कोष उत्पादनात कीटकावरील येणाऱ्या रोगामुळे घट येऊ शकते. रोगकारक जीवाणू, विषाणू किंवा बुरशीचा संगोपनगृहातून पूर्णपणे नायनाट होणे आणि संगोपन गृहातील साहित्याचे  निर्जंतुकीकरण होणे गरजेचे असते. त्यामूळे भींती किंवा शेडनेटवर २०० मिली प्रती चौरस मीटर या प्रमाणात ब्लिचिंग पावडर ०२ टक्के आणि ०.३ टक्के विरी गेलेला चूणा द्रावणासोबत फवारणी करावी व नंतर २४ तासांनी अस्त्र निर्जंतुक पावडर ५० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारल्यानंतर उर्वरित पाणी रोगकारका सोबत संगोपनगृहाबाहेर जाणे गरजेचे आहे. त्यामूळे चहूबाजूने २२.५ सें.मी. X १५ सेंमी. आकाराची नाली असणे आवश्यक आहे.

पशुसंवर्धन

शेळया व मेंढयांमध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत देवी या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात दिसून येतो. सदर आजार हा पॉक्स विषाणूपासून होणारा संसर्गजन्य साथीचा आजार असुन त्यासाठी शेतक-यांनी तीन महिने वयाच्या शेळया-मेंढयांना जानेवारी महिण्यामध्ये न चूकता पशुवैदयकांच्या सल्ल्याने लसीकरण करावे.  

इतर

शेतक-यांनी कापुस व तुर पिकांच्या काढणीनंतर रान तयार करुन पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला