छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ३१ डिसेंबर २०२५ ते ०४ जानेवारी २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला


 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८.० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४२ ते ७८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०१ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०४ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 

कृषी हवामान सल्ला

पिकाचे नाव

आद्रक

कंद वाढीची अवस्था

आद्रक पिकाचे उघडे पडलेले कंद मातीने झाकुन घ्यावेत. तसेच आद्रक पीकावर ठिपके/ करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवथथापनासाठी अझोक्सिस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली + ५ मिली स्टिकरसह १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आद्रक पीकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

हळद

कंद वाढीची अवस्था

हळद पिकाचे उघडे पडलेले कंद मातीने झाकुन घ्यावेत. तसेच हळद पीकावर ठिपके/ करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवथथापनासाठी अझोक्सिस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली + ५ मिली स्टिकरसह १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पीकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

हरभरा

फांद्या ते फुलधारणा अवस्था

सद्यस्थितीत तापमानातील चढउतारामुळे हरभरा पीकामध्ये घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत व पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा एक ते दिड फूट उंचीचे T अक्षराच्या आकाराचे ५० पक्षी थांबे प्रति हेक्टरी लावावेत. तसेच पिकात आंतरमशागत व तण व्यवस्थापनाची कामे करून पिकास गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

जवस

फुलधारणा अवस्था

जवस पीकावरील गादमाशी अथवा पिलीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी निरिक्षण करावे. प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के १०  मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

बटाटा

बटाटे लागणे अवस्था

सध्यस्थितीत तापमानातील चढउतारामुळे बटाटा पीकामध्ये लवकर येणारा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ते ३० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम किंवा प्रोपीनेब ७० टक्के डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच बटाटा पीकामध्ये रस शोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे प्रत्येकी २५ याप्रमाणे प्रति एकरी लावावेत.

मोसंबी

आंबिया बहार व्यवस्थापन

 

मोसंबी बागेतील ४० टक्के पानगळ होणे, पाने गोलाकार होणे ही व्यवस्थित ताण बसण्याची लक्षणे असुन, ताण तोडतांना शेतक-यानी झाडांच्या वयानुसार हळूहळू बागेस पाणी देण्यास सुरवात करावी व १ ग्रॅम जिब्रॅलीक आम्ल + १ किलो युरिया  प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यामुळे बहार चांगला येण्यास मदत होते. ताण तोडतांना हलक्‍या ओलिता अगोदर बागेस शिफारशीत खत मात्रा द्यावी. (५ ते ७ वर्षे वयोगटातील झाडांना ३५० ग्रॅम नत्र, १५० ग्रॅम स्फुरद, १५० ग्रॅम पालाश, ८ ते १० वयोगटातील झाडांना ४०० ग्रॅम नत्र, २०० गॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाश तर १० ते पुढील वयोगटातील झाडांना ५०० ग्रॅम नत्र, २५० स्फुरद, २५० पालाश याप्रमाणे खतमात्रा दयावी)

डाळिंब

बहार व्यवस्थापन

डाळिंब बागेस योग्य ताण बसल्यास ताण तोडताना शिफारशीत ३०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्‍फुरद, २५० ग्रॅम पालाश प्रती झाड खत मात्रा देऊन बागेस हलके पाणी दयावे.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

सध्यस्थितीत तापमानातील चढउतारामुळे भाजीपाला पीकामध्ये भुरी रोगाचा प्रादर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझाक्सीस्ट्रॉबीन २३ टक्के एससी १० मीली  किंवा कॅप्टन ५० टक्के डब्ल्यू पी २०.५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सद्यस्थितीत तापामानात घट होत असल्यामुळे भाजीपाला पीकामध्ये गरजेनुसार मोकाट पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम

सद्यस्थितीमध्ये  थंडीत वाढ होत असुन रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंशच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ अंश सें. मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा इलेकट्रीक रूम हिटरचा वापर करावा.तापमान मर्यादित असल्यास रेशीम कीटक तुती पाने खातात व त्यांची चांगली वाढ होते.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत थंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात व त्वचा रखरखीत होते. त्यामुळे अशा परिस्थितीत जनावरांना अतिरिक्त उर्जेची गरज असते. अशावेळी जास्त उर्जा देणा-या खाद्याचा जसे की भरडा, पेंड यांसारख्या स्निग्ध पदार्थांचा वापर करावा, जेणेकरुन जनावरांमधील जास्तीच्या उर्जेची गरज पूर्ण होवून अपचन टाळता येईल.

इतर

रब्बी हंगामातील पीकांना गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. तसेच फळबागेतील तापमान नियंत्रित ठेवण्याकरीता रात्रीच्या व सकाळच्या वेळी धुर करावा.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला