छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६९  ते ९२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६ ते १८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २५ व २६ जून २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ३० जून ते ०६ जुलै २०२६ दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

पिकांचेनाव

ऊस

वाढीची अवस्था

ऊस पिकामध्ये मोठी बांधणी करून घ्यावी. तसेच पिक १०० ते १२० दिवसाचे झाले असल्यास पिकास जमिनीतून खत देणे टाळावे, याव्यतिरिक्त विद्राव्य खत ठिबक द्वारे द्यावे.

कापूस

पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण,बीजप्रक्रिया  व आंतर पीके

कापूस पिकाच्या लागवडीसाठी ३.० ते ४.० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व लागवडीतील अंतर ९० X ६० किंवा ६० X ६० किंवा ६० X ३० किंवा ४५ X ३० सेमी ठेवावे. लागवडीपूर्वी थायरम किंवा कॅप्टन ३.० ग्रॅम व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास अ‍ॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. तसेच कापूस पिकामद्ये कापूस + तूर (४ : १ ६:१ किंवा ६ :२,८:२),कापूस + सोयाबीन (१:१), कापूस + मूग (१: १) रुंद ओळींमध्ये कापूस + मूग (१:२), कापूस उडीद (१:१) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते.

का

पेरणीतील अंतर,बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया 

मका पिकाच्या लागवडीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व लागवडीतील अंतर ६०X ३० ठेवावे. पेरणी/लागवडपूर्वी ट्रायकोडर्मा ०५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. तसेच सायन्ट्रीनिलीप्रोल + थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावे.

तूर

पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया 

तूर पिकाच्या पेरणीसाठी १२ ते १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी १.५ - २.० ग्रॅम बावीस्टीन अथवा २.५ ग्रॅम थायरम व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास राझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. तसेच तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी व जमिनीची आरोग्य राखण्यासाठी तुर + बाजरी (२:४), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (१:२ किंवा २:४) असे ओळीचे प्रमाण ठेवून आंतरपीक पध्दतीणे पेरणी करावी.

मूग/उडीद

पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया 

मूग/उडीद पिकाच्या पेरणीसाठी १२ ते १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ३० X १० सेमी ठेवावे. पेरणीपूर्वी १.० ग्रॅम कार्बेडेंझीम अथवा २.० ग्रॅम थायरम व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास राझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे,ते या पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर,ज्वारी,कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात.

सिताफळ

सिताफळ बागेतील सूत्रकृमींचा व मातीतून होणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी पेंड ५०० ग्रॅम प्रति झाडास द्यावे.सिताफळ बागेत खत व्यवस्थापन करावे. नविन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर,टिपी-७,धारुर-६,अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

आंबा

आंबा फळबागेतील खोड किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रौढ भुंगे हाताने गोळा करून नष्ट करावेत व हेक्टरी २-३ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. नविन आंबा बाग लागवडीसाठी पायरी, तोतापुरी, निलम,सिंधु, साईसुगंध, वनराज,लंगडा, रत्ना, परभणी भूषण,निरंजन मालीका, दोहरी इत्यादी जातीचा वापर करावा लागवडीसाठी शासकीय नोदणीकृ रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी

भाजीपाला

रोपे तयार करणे

खरीप हंगातात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटीकेत गादी वाफयावर बियाण्‍याची लागवड करून रोपे तयार करावीत.तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी व सायंकाळच्या वेळेस करावी.  

पशुसंवर्धन

उन्हाळयातील उष्ण तापमान संपूण अचानक झालेला वातावरणातील बदल, ओलसर व दमट वातावरणामुळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठ्यातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी, गोठ्यामध्ये मुबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात दुभत्या जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून काढावे. पावसाळयात मूख्यतः जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात जनावरांना कोवळा,हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.

इतर

शेतकरी बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय तसेच जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला