छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २२ ते २६ फेब्रुवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३५.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७.० ते २०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २४ ते ४९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते ०९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २६ फेब्रुवारी ते ०४ मार्च २०२५ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

फुटवे अवस्था ते कांडे धरणे

ऊस पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. खोडवा ऊस पीकास नत्राचा दुसरा हप्ता ७५ किग्रॅ प्रति हेक्टरी दयावा. पुर्व हंगामी ऊस पिकास हलकी भर दयावी.

रब्‍बी ज्‍वारी

दाणे भरणे ते परिपक्वता अवस्‍था

पक्ष्यांपासून ज्वारी पिकाच्या कणसांचे संरक्षण करण्यासाठी (उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.

मका (रब्बी)

दाणे भरणे ते परिपक्वता अवस्‍था

पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास पाणी व्यवस्थापन करावे.

गहू   

दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था

गहू पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच गहू पीकामध्ये उंदरांचा प्रादूर्भाव दिसून येत असुन उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतामध्ये ४-५ पिंजरे प्रती एकर लावावेत. तसेच १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गुळ व त्यामध्ये ३ ग्रॅम झिंक फॉस्फाईड टाकून त्याच्या गोळया कराव्यात व उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवाव्यात. जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. हे मेलेले उंदीर पुरून टाकावेत.

उन्हाळी बाजरी

वाढीची अवस्था

उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी लवकरात लवकर बीजप्रक्रिया करूनच करावी. तसेच वेळेवर पेरणी केलेल्या बाजरी पीकास गरजेनुसार पीकास पाणी व्यवस्थापन करावे.

कांदा

कंद वाढीची अवस्था

सद्यस्थितीत कमाल तापमानात वाढ होत असून वातावरणातील बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढत आहे तरी शेतकरी बांधवानी कांदा पिकास नियमित पाणी व्यवस्थापन करावे. तसेच कांदा पीकास पुर्नलागवड करुन महिना झाला असल्यास पीकास १९:१९:१९ खते २.५ किलो व १० किलो गंधक प्रति एकर याप्रमाणात ठिंबक सिंचनाव्दारे पाण्यातून द्यावे.

आंबा

फुलोरा ते फळधारणा/ फळ वाढीची अवस्‍था

उशीरा फुटलेल्या आंबा बागेमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीओनेट १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे आंबा फळबागेमध्ये फळगळ दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड (एनएए, ४.५ एसएल)  ५.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना व दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची असताना करावी. तसेच आंबा बागेतील फळगळ रोखण्यासाठी बागेत पाण्याच्या नियमित पाळया दयाव्यात.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तापमानातील चढउतारमुळे वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुसंवर्धन

जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात.

इतर

सद्यस्थितीत कमाल तापमानात वाढ होत असून वातावरणातील बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढत आहे. तरी शेतकरी बांधवानी पिकांना व फळबागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच विविध आच्छादनांचा वापर करावा, जेणेकरुन बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी होवून पाण्याच्या पाळया कमी होतील.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला