छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्‍वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. ०३ ते ०६ जुन २०२६ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३१ ते ७२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ०२ व ०३ जून २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०७ ते १३ जून २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.

                                                कृषी हवामान सल्ला

पिकाचे नाव

सोयाबीन

वाणांची निवड

सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करावीत. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी एमएयुएस-१५८, एमएयुएस-१६२, एमएयुएस-६१२, एमएयुएस-७२५, केडीएस-७२६, केडीएस-७५३ यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी.

खरीप ज्वारी

वाणांची निवड

खरीप ज्वारी पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करावीत. खरीप ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी, परभणी-शक्ती, एसपीव्ही-९६०, सीएसएच-२५, परभणी- श्वेता,  पीव्हीके-८०९, पीव्हीके-८०१ यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी.

बाजरी

वाणांची निवड

बाजरी पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करावीत. बाजरी पिकाच्या लागवडीसाठी, धनशक्ती, परभणी संपदा, एएचबी-१२००, एएचबी -१२६९, आयसीटीपी, श्रद्धा आणि सबुरी यासारख्या सुधारित वाणांची निवड करावी.

आद्रक

वाणांची निवड

आद्रक पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करावीत. आद्रक पिकाच्या लागवडीसाठी, माहिम, रिओ दि जानिरो, सुरुची, सुप्रभा या सुधारित वाणांची निवड करावी.

हळद

वाणांची निवड

हळद पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करावीत. हळद पिकाच्या लागवडीसाठी, सेलम, कृष्णा, राजापुरी, वायगाव, टेकून आणि पेंटा यासारख्या सुधारित वाणांची निवड करावी.

मोसंबी

जातीची निवड/ वाढीची अवस्था

वनामकृवि, परभणी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या नवीन मोसंबी बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सालगुडी, काटोल गोल्ड  तर लिंबू बाग लागवडीसाठी साई सरबती, प्रमालिनी, पीकेएम-१ या वाणांची निवड करावी. जुन्या बागेत आंतरमशागतीची कामे पुर्ण करुन घ्यावीत. बोर्डो पेस्ट लावला नसल्यास लावून घ्यावा.

डाळिंब

जमिनीची निवड व मृग बहार

डाळिंब पिकाच्या नवीन लागवडीसाठी वनामकृवि, परभणी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता इत्यादी वाणांची निवड करावी. जुन्या बागेत आंतरमशागतीची कामे पुर्ण करुन घ्यावीत.

मृग बहार घेण्याचे नियोजन असल्यास बाग ताणावर असताना मे महिन्याच्या शेवटी इथेफोन ३९ % एस एल ची फवारणी करून पानगळ करून घ्यावी व नंतर हलकी छाटणी करून घ्यावी.छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शेंड्याकडून १० ते १५ सेमी पर्यंत छाटाव्यात तसेच वाळलेल्या फांद्या छाटाव्यात व बागेत पडलेला काडीकचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी.

भाजीपाला

लागवड पूर्व नियोजन

खरीप हंगामातील भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी ३ X २ मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. त्यामध्ये ३-४ किलो चांगले कुजलेले शेणखत, १५:१५:१५ हे मिश्रखत २०० ग्रॅम व शिफारशीत दाणेदार कीटकनाशक चांगले मिसळून घ्यावे. भाजीपाल्याचे बियाणे ३-४ सें.मी. खोलीवर पेरून मातीने झाकावे. त्यानंतर झारीच्या साहाय्याने हलके पाणी द्यावे.

तुती रेशीम

पट्टा पद्धत तुती लागवडीत शेंद्रीय पदार्थाचे किंवा पॉलिथिन आच्छादनाचा वापर करावा. शेंद्रीय आच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष, झाडांची पाने, उसाची पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील मळी याचा वापर करावा. पट्टा पद्धत तुती लागवडीत एकास आड एक पट्यात २ x २.५ x १.५ फूट आकाराची चर करून त्यात वरील शेंद्रीय पदार्थ भरावेत.

पशुसंवर्धन

पावसाळ्यातील प्राणघातक रोग जसे कि, घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत इत्यादी जीवघेण्या रोगापासून जनावरांच्या बचावासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. 

इतर

शेतकरी बांधवानी जमिनीची मशागत समतल किंवा मुख्य उताराला आडवी करावी त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला