छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २८ जाने. ते ०१ फेब्रु. २०२६ साठी हवामान अंदाज

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४० ते ७७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०३ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.    

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०१ ते ०७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

पिकाचे नाव

आद्रक

परिपक्वता ते काढणी

आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित ब्रश कटरचा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्‍टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. काढणी केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी साठवणूक करावी.

हळद

परिपक्वता ते काढणी

काढणीस तयार असलेल्या हळद पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे. 

हरभरा

फुलधारणा/घाटे धरणे

हरभरा पीकामध्ये घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत व पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा एक ते दिड फूट उंचीचे T अक्षराच्या आकाराचे ५० पक्षी थांबे प्रति हेक्टरी लावावेत. तसेच व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम किंवा क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिलि  प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

जवस

बोंड धरणे अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे जवस पीकावरील गादमाशी अथवा पिलीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी निरिक्षण करावे. प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के १०  मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

बटाटा

कंद लागणे ते कंद वाढीची अवस्था

बटाटा पिकातील तणनियंत्रण करुन वरंब्यास मातीची भर दयावी तसेच पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे बटाटा पिकावर रस शोषण करणार्‍या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० टक्के) १५ मिली किंवा अ‍ॅसिटामीप्रीड २-३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पिवळ्या व निळया रंगाचे चिकट सापळे (छोट्या आकाराची) प्रत्येक ४-५ ओळींनंतर एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.

मोसंबी

फुलधारणा अवस्था

मोसंबी बागेला पाणी व्यवस्थापन करताना झाडाच्या खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मागील आठवड्यातील ढगाळ हवामान मोसंबी बागेमध्ये कोवळ्या पानावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के ईसी २० मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एसएल २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळिंब

फुलधारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ हवामान व तापमानातील चढउतारामुळे डाळिंब बागेत फुलगळ होत आहे याच्या व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलीक ऍसिटिक ऍसिड (एनएए) २ ते ३ मिली आणि ००:५२:३४ विद्राव्य खते ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून मिसळून फवारावे.

भाजीपाला

फळ धारणा ते

फळवाढीची अवस्था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे भेंडी पिकावर रस शोषण करणाऱ्या (तुडतुडे/पांढरीमाशी/मावा) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी २३ मिली  प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पिकास पाणी द्यावे व काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम

रेशीम कोषाचा ए-ग्रेड उत्तम प्रकारे मिळवण्यासाठी किटक संगोपन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. खादय म्हणून तूती पानात पाण्याचे प्रमाण ८० टक्के मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत ६ ते ७ दिवसाला तर भारी जमिनीत १०-१२  दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात.

पशुसंवर्धन

सध्य स्थितीत जनावरांमध्ये गोचीड या रक्त शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी नियमित गोठ्याची स्वछता करणे गरजेचे आहे तसेच पशुधनावर ५ टक्के निबोळी अर्काचा शिडकाव आठ्वड्यातून दोन वेळा करणे गरजेचे आहे.

इतर

शेतक-यांनी कापुस व तुर पिकांच्या काढणीनंतर रान तयार करुन पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला