छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०४ ते ०८ फेब्रु. २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २८ ते ६२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०८ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

पिकाचे नाव

आद्रक

परिपक्वता ते काढणी

आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित ब्रश कटरचा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्‍टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. काढणी केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी साठवणूक करावी.

हळद

परिपक्वता ते काढणी

हळद पिकाची काढणी जमिनीत योग्य ओलावा बघून करावी. कंद काढणीपूर्वी राहिलेली पाने जमिनीलगत कापून घ्यावीत. जर हळद पिकाची लागवड सरीवरंबा पद्धतीने केली असल्यास काढणी कुदळीच्या सहाय्याने करावी व लागवड गादीवाफ्यावर केली असल्यास काढणी यंत्राच्या सहाय्याने करावी. काढणी करत असताना गडडयांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणी करताना जेठे गड्डे व हळकुंडे वेगळी करावीत व काढणीनंतर योग्य ठिकाणी साठवणूक करावी.

हरभरा

घाटे धरणे  ते दाणे भरणे अवस्था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम किंवा क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिलि  प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. तसेच पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

जवस

काढणी अवस्था  

काढणीस तयार असलेल्या जवस पिकाची काढणी करुन घ्यावी.

बटाटा

कंद लागणे ते कंद वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे बटाटा पिकावर उशिरा येणार करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब (७५ टक्के) २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड (५० टक्के) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जर प्रादुर्भाव जास्त असल्यास मेटॅलॅक्‍झिल (८ टक्के) + मॅन्कोझेब (६४ टक्के) हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

मोसंबी

फुलधारणा अवस्था

मोसंबी बागेला पाणी व्यवस्थापन करताना झाडाच्या खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मोसंबी बागेमध्ये जमिनीलगत अतिओलाव्यामुळे फायटोप्थोरा  बुरशीचा प्रादूर्भाव होवून झाडांची पाने पीवळी पडून गळत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी खोडालगत ५-१० सें.मी. पर्यंत माती लावून लगेच कॉपर ऑक्झीक्लोराईड या बुरशीनाशकाची २० ग्रॅम प्रति १० लिटर प्रमाणे ८ दिवसाच्या अंतराने दोन वेळा आळवणी करावी.

डाळिंब

फुलधारणा अवस्था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे डाळिंब बागेत फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच डाळिंब बागेस पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

फळ धारणा ते

फळवाढीची अवस्था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे भेंडी पिकावर रस शोषण करणाऱ्या (तुडतुडे/पांढरीमाशी/मावा) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी २३ मिली  प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पिकास पाणी द्यावे व काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम

रेशीम कोषाचा ए-ग्रेड उत्तम प्रकारे मिळवण्यासाठी किटक संगोपन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. खादय म्हणून तूती पानात पाण्याचे प्रमाण ८० टक्के मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत ६ ते ७ दिवसाला तर भारी जमिनीत १०-१२  दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात.

पशुसंवर्धन

सध्य स्थितीत जनावरांमध्ये गोचीड या रक्त शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी नियमित गोठ्याची स्वछता करणे गरजेचे आहे तसेच पशुधनावर ५ टक्के निबोळी अर्काचा शिडकाव आठ्वड्यातून दोन वेळा करणे गरजेचे आहे.

इतर

शेतक-यांनी कापुस व तुर पिकांच्या काढणीनंतर रान तयार करुन पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला