छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २५ फेब्रु. ते ०१ मार्च २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्लापत्रिका
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व
आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच
कमाल तापमान ३४.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १८.० अंश
सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २१ ते ७२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग
०८ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०१ ते ०७ मार्च २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून पर्जन्यमान व कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
पिकाचे नाव
आद्रक
काढणी
आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाने
सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित ब्रश कटर चा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा.
पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड
असल्यास ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. काढणी
केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी
साठवणूक करावी.
हळद
शिजवणी व वाळवणी
हळद काढणीनंतर त्वरित सावलीत साठवणूक करावी. त्यानंतर ४ ते ५ दिवसांमध्येच
हळदीवर शिजविण्याची प्रक्रिया करावी. हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करून
घ्यावी. कारण सर्व हळकुंडांचा आकार
एकसारखा नसतो, जाडी कमी अधिक असते. त्यामुळे जाड हळकुंडांना शिजण्यास जास्त वेळ तर
लहान हळकुंडांना कमी वेळ लागतो.शिजवलेली हळद १२ ते १५ दिवस उन्हात चांगली वाळवावी.
पहिले चार दिवस दोन इंचापेक्षा जाड थर देऊ नये. ओली हळद सायंकाळी एकत्र गोळा करू
नये. हळद वाळत घालताना कठीण जागी
किंवा शेडनेट किंवा जुन्या साड्यांवर वाळवावी.काळ्या मातीत जमीन सपाट करून पसरू
नये. कारण, मातीचा ओल्या हळदीशी
संपर्क येतो शिवाय मालाची प्रत खराब
होते.पूर्ण वाळलेली व अर्धवट वाळलेली हळद एकत्र मिसळू नये. अधूनमधून हात देताना
कमी शिजलेली, जादा फुगीर हळकुंडे
त्वरित वेचून बाजू ला काढावीत. अशा
हळकुंडांना किमान ४ वेळा जास्त ऊन द्यावे. वाळवलेल्या हळकुंडामध्ये आर्द्रतेचे
प्रमाण ११ ते १२ टक्के एवढे असावे.
हरभरा
परिपक्वता ते काढणी अवस्था
वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करुन मळणी करुन घ्यावी व मळणी केलेल्या धान्याची योग्य वाळवुन सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी.
जवस
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या जवस पिकाची काढणी करुन घ्यावी.
उन्हाळी मका
रोप अवस्था
उगवून आलेल्या मका पिकास पाणी व्यवस्थापन करावे.
बटाटा
परिपक्वता ते काढणी अवस्था
काढणीपूर्वी बटाटा पिकास १० ते १२ दिवस पाणी देणे बंद करावे. त्यामुळे
बटाट्याची साल घट्ट होते आणि बटाट्यास चकाकी येते. पाणी बंद केल्यावर झाडे
जमिनीलगत बुंध्याजवळ विळयाच्या सहाय्याने कापून घ्यावीत व कापलेली झाडे
काढणीपर्यंत त्याच ठिकाणी ठेवावीत. जेणेकरून बटाटे हिरवे पडण्याचे प्रमाण कमी
होईल.
मोसंबी
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे मोसंबी बागेमध्ये फुलगळ व फळगळ दिसून
येत असून याच्या व्यवस्थापनासाठी १ किलो युरिया + २ ग्रॅम एनएए किंवा प्लॅनोफिक्स
३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच बागेमध्ये गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे.
डाळिंब
फळधारणा ते फळवाढीची अवस्था
डाळींब बागेतील फळांची संख्या व आकार वाढविण्याकरीता बागेस ००:५२:३४ व
००:००:५० या विद्राव्य खते ११ किलो प्रती हेक्टर प्रत्येक वेळी याप्रमाणे ७
दिवसाच्या अंतराने ४ वेळा ड्रीपव्दारे सोडावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५
मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकास
गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
तुती रेशीम
वाढीची अवस्था
तुती बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
पशुसंवर्धन
सध्य स्थितीत जनावरांमध्ये गोचीड या रक्त शोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी नियमित गोठ्याची स्वछता करणे गरजेचे
आहे तसेच पशुधनावर ५ टक्के निबोळी अर्काचा शिडकाव आठ्वड्यातून दोन वेळा करणे
गरजेचे आहे.
इतर
शेतक-यांनी कापुस
व तुर पिकांच्या काढणीनंतर रान तयार करुन पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी
भाजीपाला पिकांची लागवड करावी.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment