छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०६ ते १० जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४७ ते ९७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १२ किमी/ता६ राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १०  ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

फुटवे अवस्था ते कांडे धरणे

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

कापुस

वेचणी अवस्था

शेतकरी बांधवानी फरदड घेणे टाळावे. कापूस पिकाची शेवटची वेचणी झाल्याबरोबर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उभी कपाशी कॉटन श्रेडरच्या साहाय्याने मूलस्थानी कुटी करावी त्यानंतर युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट १०० किलो प्रति हेक्टर समप्रमाणात मिसळून टाकावे व मशागत करून केलेली कुटी मातीआड करावी जेणेकरून येणाऱ्या खरीप हंगामापर्यंत संपूर्ण कापूस कुटी कुजून जमिनीतील सेंद्रिय घटकामध्ये वाढ होईल.

तुर

काढणी अवस्था

पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता जिल्हयामध्ये अतिशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन कापणी केलेल्या तुर पीकाची लवकरात लवकर मळणी घ्यावी व धान्य वाळविण्याकरीता सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

रब्‍बी ज्‍वारी

पोटरी  अवस्‍था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे रब्बी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  तसेच रब्‍बी ज्‍वारी पिकामध्ये चिकट्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निबोळी अर्क १०००० पीपीएम १० मिली किंवा डायमिथोएट २० मिली  प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

करडई

बोंडया धरणे

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे करडई पिकातील रस शोषण करणा-या (काळा मावा) किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

मका (रब्बी)

वाढीची ते  कणसे धरणे अवस्‍था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

गहू   

मुकुट मुळे/ फुटवे/ पोटरी अवस्था

सध्याचे वातावरण गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निबोळी अर्क (१०००० पीपीएम) १० मिली किंवा डायमिथोएट २० मिली  प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

कांदा

कंद धरणे अवस्था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे कांदा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. तसेच कांदा पिकावरील मावा, तुडतुडे व फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.

पेरू

परीपक्वता अवस्था

सध्य स्थितीतील वातावरणामुळे पेरु बागेमध्ये फळकूज रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० टक्के डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यामध्ये मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. त्याचप्रमाणे खाली पडलेली रोगग्रस्त व किडग्रस्त फळे गोळा करुन नष्ठ करावीत. काढणीस तयार असलेल्या पेरु फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावेत.

आंबा

फुलधारणा अवस्था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे आंबा फळबागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीओनेट १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फळधारणा ते फळवाढीची अवस्था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे टोमॅटो पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रानिलीप्रोल १८.५  एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

पशुसंवर्धन

शेतकरी बांधवांनी शेळया व मेंढयांना सकाळी उशीरा चरण्यासाठी सोडावे व सर्दी जाणवल्यास पशुवैदयकांच्या सल्ल्याने उपचार करावा.

इतर

शेतक-यांनी रब्बी हंगामातील पीकांना त्यांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत गरजेनुसार पाणीव्यवस्थापन करावे, जेणेकरुन ओलाव्यामुळे जमीनीतील अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होवून ताण कमी राहिल्याने किडींचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व उत्पन्नात वाढ होते.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आली.

Comments