छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २० ते २४ एप्रिल २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते ढगाळ राहून दि. २१ ते २३ एप्रिल २०२४ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५.० ते २७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २३ ते ४९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १३ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. 

सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २१ एप्रिल २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २४ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

कांडे धरणे 

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

उन्हाळी बाजरी

कणसे धरणे ते दाणे भरणे अवस्था

बाजरी पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

आंबा

फळ वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील तापमानातील चढउतार व ढगाळ वातावरणामुळे आंबा फळावर काळे डाग दिसून येत असून याच्या व्यवस्थापानासाठी कार्बेन्डाझिम १० टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के डब्ल्यू पी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी. तसेच आंबा फळबागेतील झाडांच्या आळ्यामध्ये गवत, पालापाचोळा इत्यादी आच्छादनांचा वापर करून गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच दि. २१ एप्रिल २०२४ रोजी वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवानी काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करावी जेणेकरून वादळी वाऱ्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.

पुढील पानावर....

भाजीपाला

फुले ते फळधारणा अवस्था

भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे टोमॅटो पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम २५ डब्लूसी ४ मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के २० ‍मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.

चारा पिके

वाढीची अवस्‍था

चारा पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच काढणीस तयार असलेला हिरवा चारा कापणी करुन जनावरांना दुपारच्या वेळेस खाण्यास द्यावा.

पशुसंवर्धन

तापमानात वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील तापमान ‍नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे. तापमानात वाढ होत असुन शेतकरी बांधवांनी जनावरांना दिवसा उन्हात चरावयास नेऊ नये व ‍पिण्यास भरपुर प्रमाणात स्वच्छ व थंड पाणी द्यावे.

इतर

शेतकरी बांधवांनी शेतातील कामे सकाळ व सायंकाळच्या वेळेतच करावीत. तसेच          मागील दोन वर्षी नांगरणी केली नसल्यास खोल नांगरणी करुन घ्यावी. जेणेकरुन नांगरटीनंतर जमीन उन्हात तापून जमीनीतील किड व रोगकारक बुरशींच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल. तसेच नांगरणी केलेल्या शेतामध्ये रोटाव्हेटरचा वापर करणे टाळावे.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे. 

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला