छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ११ ते १५ मे २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३७.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५.० ते २७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४२ ते ६१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ९ ते १५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. 

सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १० ते १२ मे २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १५ ते २१ मे २०२४ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त तर किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

कांडे धरणे 

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे  ऊस पिकामध्ये खोडकिडा दिसून येत असुन याच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ - ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत फवारणी करावी. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

उन्हाळी बाजरी

दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था

बाजरी पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

आंबा

फळ वाढीची ते काढणी  अवस्था

ाढणीस तयार असलेल्या आंबा फळांची सकाळ व सायंकाळच्या वेळेस काढणी करुन घ्यावी. आंबा फळांची काढणी देठासहित करावी जेणेककरुन फळांचे काढणी पश्चात आयुष्य वाढून पक्वता एकावेळेस होण्यास मदत होते. तसेच आंबा पिकाचे फळ माशीपासून संरक्षण करण्यासाठी फळमाशी सापळे ०४ प्रति हेक्टर या प्रमाणात वापरावे.

भाजीपाला

फुले ते फळधारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे भेंडी पिकात फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तसेच वांगी पिकावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एससी ४ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.  

चारा पिके

वाढीची अवस्‍था

चारा पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच काढणीस तयार असलेला हिरवा चारा कापणी करुन जनावरांना दुपारच्या वेळेस खाण्यास द्यावा.

पशुसंवर्धन

तापमानात वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील तापमान ‍नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे. तापमानात वाढ होत असुन शेतकरी बांधवांनी जनावरांना दिवसा उन्हात चरावयास नेऊ नये व ‍पिण्यास भरपुर प्रमाणात स्वच्छ व थंड पाणी द्यावे.

इतर

सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असुन शेतक-यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांना व फळबागेस सकाळ व सायंकाळच्या वेळेस संरक्षित सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तसेच शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना प्रखर सूर्य प्रकाश असताना दुपारच्या वेळेत काम करणे टाळावे.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला