छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १२ ते १६ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५६ ते ८८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ११ व १२ ऑक्टोबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १६ ते २२ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

वाढीची ते कांडे धरणे अवस्था

मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे ऊस पिकामध्ये लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस (२० टक्के इ.सी.) १० ते १५  मिली किंवा सिफेट २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी

कापूस

पाते लागणे ते बोंड धरणे

मागील काही दिवसातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढ उतारामुळे कापुस पिकाची पाने लालसर दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डीएपी २०० ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट १०० ग्रॅम किंवा पोटॅशिअम नायट्रेट १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस पिकातील डोमकळया दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात.

मका

काढणी अवस्था

मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी. त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत. त्यानंतर कणसातील दाणे काढण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करावा. सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.

 

तूर

कळी ते फुलधारणा

मागील आठवडयामधील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे तूर पीकामध्ये पाने खाणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी २० मीली किंवा फ्लुबेंडामाईड ३९.३५ टक्के एससी २.५ मीली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

रब्‍बी ज्‍वारी

बीजप्रक्रिया ते पेरणी

रब्‍बी ज्‍वारी पेरणीसाठी  १० किलो प्रती हेक्टर बियाणे घ्यावे.तसेच पेरणीचे अंतर ४५ x १५ सेंमी ठेवावे व पेरणीपूर्वी ३०० मेस गंधक ०४  ग्रॅम आणि इमेडाक्लोप्राइड  ४ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी त्यानंतर अझॅटोबॅक्टर + पीएसबी २५ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. ज्वारी पिकाची पेरणी वाफसा येताच करुन घ्यावी. उतार जमीनीत ज्वारी पीकाची पेरणी उतारास आडवी करावी. कोरडवाहूसाठी ४०: २०: २० याप्रमाणे नत्र स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. तर बागायतीसाठी ४०: ४०: ४० याप्रमाणे नत्र स्फुरद व पालाश खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी. कोरडवाहू ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तर बागायती ज्वारीच्या पेरणी ३१ ऑक्टोंबर पर्यंत करता येते.

करडई

बीजप्रक्रिया ते पेरणी

करडई पिकाच्या पेरणीसाठी १२-१५ किल्लो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ४५ x २० किंवा ३० x १० जमीनिच्या प्रकारानुसार ओळीतील अंतर ठेवुन जमिनीत वाफसा येताच करडई पिकाची पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्‍यास थायरम ४ ग्रॅम प्रती किलो किंवा कार्बेन्‍डॅझिम २ ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीया करावी त्यानंतर अँझोटोबॅक्टर अथवा झोस्पीरीलम + पीएसबी २० ते २५ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी.  कोरडवाहूसाठी २०: २०: ०० याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी.

कांदा

रोपवाटीका तयार करणे

कांदयाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे १ मी रुंद, ३ मी लांब आणि १५ सेमी उंच तयार करावा. वाफयाच्या रुंदीशी समांतर अशा ५ सेमी बोटाने रेषा पाडाव्यात आणि यामध्ये बियाणे ओळीत पातळ पेरुन नंतर मातीने झाकुन टाकावे. कांदा लागवडीसाठी ग्रीफाउंड डार्क रेड, ग्रीफाउंड लाईट रेड,भिमा रेड, भिमा किरण (लाल कांदा) आणि भिमा स्वेत, भिमा सफेद (पांढरा कांदा) या वाणांचा वापर करावा. 

पेरू

फळ वाढीची अवस्था

पेरु बागेतील फळमाशीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी व त्याच्या नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉलचे सापळे लावावेत. तसेच पेरू फळबागेत फळांची जास्त संख्या असलेल्या फांदयांना बांबूचा आधार दयावा. जेणेकरुन फळांच्या वजनाने झाडांचे नुकसान होणार नाही.

सिताफळ

फळ वाढीची आणि काढणी अवस्था

काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी केल्यानंतर प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

सध्यस्थितीत फुलगोभीवर गडडा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मॅलेथीऑन ५० ईसी १५ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुसंवर्धन

शेळया व मेंढयांच्या पिल्लांना पशुवैदयकांच्या सल्ल्याने जंतनाशके दयावीत.

इतर

कोरडवाहू रब्बी पिकांची पेरणी (ज्वारी, हरभरा,जवस,करडई) लवकरात लवकर पुर्ण करावी.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला