छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०९ ते १३ जुलै २०२५ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १० ते १५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात दि. ०८ व ०९ जुलै २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या
कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३०
ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १३ ते १९ जुलै २०२५ दरम्यान हवामान
अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची
शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
वाढीची अवस्था
सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता
असल्यास तण नियंत्रणासाठी पीक १५ ते २० दिवसाचे झाले असल्यास इमॅझेथायपर ३५ टक्के
+ इमाझामॉक्स ३५ टक्के डब्ल्यूजी २ ग्रॅम किंवा क्लोमॅझोन ५० % ईसी ३० ते ४० मिली
या तणनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
खरीप ज्वारी
वाढीची अवस्था
खरीप ज्वारी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे कामे स्वच्छ वातावरण व
शेतात वापसा असताना करून घ्यावीत.
बाजरी
वाढीची अवस्था
बाजरी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे
कामे स्वच्छ वातावरण व शेतात वापसा असताना करून घ्यावीत.
खरिप भुईमुग
वाढीची अवस्था
खरीप भुईमूग पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे कामे स्वच्छ वातावरण व
शेतात वापसा असताना करून घ्यावीत.
आद्रक
रोप अवस्था
आद्रक पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी. तसेच आद्रक
पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी परभणी कृषि विद्यापीठाने
विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण
२०० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
हळद
रोप अवस्था
हळद पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे. तसेच हळद पिकामध्ये माती
परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित व प्रमाणशीर योग्य वेळेस वापर करावा. माती
परीक्षण केलेली नसल्यास ६ आठवडे झालेल्या पिकास नत्राचा शिफारसीत दुसरा हप्ता
शेतात वापसा असताना देऊन बेडला हलकी भर द्यावी.
मोसंबी
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होण्याची
शक्यता असते, यासाठी प्रतीबंधात्मक
उपाय म्हणुन कार्बेनडेझीम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी.
डाळिंब
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये रस शोषण
करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलिप्रोल १०.२३ टक्के ओ. डी. ७.५ मिली
किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे मिरची पिकामध्ये मर रोगाचा
प्रादुर्भाव दिसून येत
असून याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
तुती रेशीम
पावसाळयात ढगाळ हवामानात रेशीम किटक संगोपन गृहातील आर्द्रता ९५ ते ९९
टक्के पर्यंत राहते. अशा वेळी बाल्य ते प्रौढ किटक संगोपन गृहात अनुक्रमे तापमान
२८ व २६ अंश सें. व आर्द्रता अनुक्रमे ८५
व ६५ टक्क्यांच्या वर गेली तर ग्रासरी व प्लॅक्चरी या रोगांची बाधा किटकांना होते.
त्यामुळे संगोपन गृहात स्वच्छता राखणे. शेडनेटच्या आजुबाजुला व दरवाज्यासमोर ०.३
टक्के चुना + २ टक्के ब्लिचिंग पावडरचे द्रावण करुन शिंपडावे. संगोपन साहित्य ट्रे
स्वच्छता जाळया, आच्छादन जाळया २ टक्के फॉरमॅलीन मध्ये निर्जंतुकीकरण करुन उन्हात
वाळवुन वापरावे.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेडमध्ये नवीन भुसा टाकून
घ्यावा तसेच शेडमध्ये ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे शेडच्या
भोवताली चुना टाकून घ्यावा जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल.
इतर
सर्व शेतकरी बांधवांकरीता त्यांच्या
शेतातील पीकांवरील बुरशींचे तसेच पीकातील खत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक
बुरशीनाशके (बायोमिक्स) व जैविक खते (बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान
केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकरीता उपलब्ध आहेत.
Comments
Post a Comment