छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०१ ते ०५ जुलै २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान
२३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७९ ते ९५ टक्के राहील
तर वाऱ्याचा वेग १४ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. ३० जून आणि ०२ व ०३ जुलै २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०५ ते ११ जुलै २०२६ दरम्यान हवामान ढगाळ
राहून पर्जन्यमान सरासरी पेक्षा जास्त
राहण्याची शक्यता असून कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता
आहे.
कृषी हवामान सल्ला
पिकाचे नाव
सोयाबीन
पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
सोयाबीन पिकाच्या
पेरणीसाठी ६५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ X ५ सें.मी. ठेवावे. पेरणीपुर्वी बियाण्यास २-३
ग्रॅम बावीस्टीन + ३-४ ग्रॅम थायरम व त्यानंतर ०५ मिलि प्रति किलो
याप्रमाणे ब्रॅडीराझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. त्यानंतर
बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी. तसेच सोयाबीन
पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ३० किलो नत्र ६० किलो
स्फुरद व ३० किलो पालाश दयावे. तसेच
सोयाबीन पिकामध्ये तणनाशक पेंडीमिथॅलीन ०.७५ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर ७५०
ते १००० लिटर पाण्यात मिसळून पेरणीपूर्वी फवारावे.
खरीप ज्वारी
पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
ज्वारी पिकाच्या
पेरणीसाठी ७.५ किलो संकरित व १० किलो सुधारित प्रती हेक्टर बियाणे वापरावे व
पेरणीतील अंतर ४५ x १२.५ से.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी ३०० मेस सल्फर २.५ ग्रॅम आणि
इमेडाक्लोप्राइड ४ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच
अझॅटोबॅक्टर + पीएसबी ५ मिलि प्रती किलो प्रमाणात बिजप्रक्रीया करूनच जमीनीमध्ये
पेरणीयोग्य ओलावा असताना पेरणी करावी. तसेच खरीप ज्वारीस ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश
प्रती हेक्टरी पेरणी करताना दयावे.
बाजरी
पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
बाजरी पिकाच्या पेरणीसाठी
३ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ४५ x १० से.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी ६ ग्रॅम
मेटॅलॅक्झील प्रती किलो व त्यानंतर अझोस्पिरिलम व स्फुरद विरघळणारे जिवाणू
संवर्धनाची १० मिली प्रती किलो बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर बियाणे सावलीमध्ये
वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी. तसेच पिकास हलक्या
जमिनीत ४०:२०:२० व मध्यम ते भारी जमिनीत ६०:३०:३० पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी
करताना दयावे.
खरिप भुईमुग
पेरणीतील अंतर, बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
भुईमूग पिकाच्या
पेरणीसाठी १०० ते १२० किलो (उपट्या) तर ८० ते १०० किलो (पसऱ्या) प्रती हेक्टर
बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ३० x १० से.मी व
४५ x १५ से. मी. ठेवावे. पेरणीपूर्वी २५० ग्रॅम रायझोबियम व पीएसबी ची प्रती १०
किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच जमिनीत पेरणीयोग्य ओलावा असतांना पेरणी करावी.
तसेच भुईमूग पिकास २०:५०:०० नत्र : स्फुरद : पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणी करताना दयावे.
आद्रक
लागवड
आद्रक बेणेप्रक्रिया
करतांना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बेणेप्रक्रिया करावी. यासाठी क्विनॉलफॉस (२०
टक्के प्रवाही) २० मिली किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मिली या
किटकनाशकापैकी एक किटकनाशक आणि कार्बेन्डाझिम (५० टक्के) १५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब
३० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले
बुडवावेत. २० मिनिटानंतर बेणे सावलीत सुकवून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची
बीजप्रक्रिया करावी. बेणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर अझोस्पिरिलम
२५ ग्रॅम तसेच पीएसबी २५ ग्रॅम प्रति लीटर
पाणी याप्रमाण मिसळून १० ते १५ मिनिटे बेणे बुडवून ठेवावे व त्यानंतर लागवड करावी. बेणे प्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण
१०० ते १२० किलो बेण्यास वापरावे.
हळद
लागवडपुर्व नियोजन
हळद लागवडीकरीता ७५ ते ९०
से.मी. अंतरावर सरी पाडून घ्याव्यात. सरी पाडण्यापुर्वी शिफारशीत स्फुदर व पालाश
जमिनीत मिसळावे. तसेच जमीनीच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचा एक याप्रमाणे
वाफे तयार करावेत.
मोसंबी
वाढीची अवस्था
मोसंबी फळबागेत ५००: ५००:
५०० ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश रासायनिक खतमात्रा + ४० किलो शेणखत प्रती झाड
द्यावी.
डाळिंब
वाढीची अवस्था
डाळिंब फळबागेत ३००: २५०:
२५० ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश
रासायनिक खतमात्रा + ४० किलो शेणखत प्रती झाड द्यावा.
भाजीपाला
रोपे तयार करणे
खरीप हंगातात भाजीपाला लागवडीसाठी
रोपवाटीकेत गादी वाफयावर बियाण्याची लागवड करून रोपे तयार करावीत. तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकाची काढणी सकाळी व सायंकाळच्या वेळेस करावी.
तुती रेशीम
लागवड पुर्व तयारी
उन्हाळ्यात
शक्यतो पट्टा पद्धत तुती लागवडीत शेंद्रीय पदार्थाचे किंवा पॉलिथिन आच्छादनाचा
वापर करावा. शेंद्रीय आच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष, झाडांची पाने, उसाची पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील मळी याचा वापर करावा. पट्टा
पद्धत तुती लागवडीत एकास आड एक पट्यात २ x २.५ x १.५ फूट आकाराची चर करून त्यात वरील शेंद्रीय पदार्थ भरावेत.
पशुसंवर्धन
पशुपालकांनी
जनावरांच्यावर असणारे बाह्य परजीवींचे (गोचीड, डास, गोमाशी इत्यादी) नियंत्रण
करावे. तसेच जनावरांना लसीकरणापूर्वी जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा.
इतर
शेतकरी
बांधवानी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाल्याशिवाय पेरणीची
घाई करू नये.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment