छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १० ते १४ ऑक्टोबर २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला


 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३६.० ते ३८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४७ ते ६६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १ ते ५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १४ ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

 कृषि हवामान सल्ला

पिकांचेनाव

ऊस

कांडे अवस्था

ऊस पिकामध्ये लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस (२० टक्के इ.सी.) १० ते १५  मिली किंवा ॲसिफेट २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पिकास उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

कापूस

बोंड धरणे ते वेचणी

कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. तसेच वेचणीस तयार असलेल्या कापसाची वेचणी करावी व पिकास उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

मका

परिपक्वता ते काढणी अवस्था

मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी. त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत. त्यानंतर कणसातील दाणे काढण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करावा.सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.

तुर

फांद्या लागणे

तुर पिकास उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

सिताफळ

फळवाढीची अवस्था

सीताफळ बागेतील तण व्यवस्थापन करावे. तसेच पाण्याच्या उपलब्धते नुसार पाणी  व्यवस्थापन करावे.  

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सध्यस्थितीत फुलगोभीवर गडडा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मॅलेथीऑन ५० ईसी १५ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत शेळ्यांमध्ये जुलाब/हगवण लागल्याचे दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे.

इतर

सद्यस्थितीत वातावरणातील तापमानवाढीमुळे फळपिकांवर पाण्याचा अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी फळबागामध्ये झाडाचा पालापाचोळा झाडाच्या बुडाला टाकावा तसेच झाडांच्या फांद्याची हलकी छाटणी करावी व झाडांवरील फळे काढून मार्केटमध्ये विक्रीस पाठवावीत. जेणेकरुन फळबागातील बाष्पीभवनाचा वेग कमी होवून पीकांवरील अतिरिक्त पाण्याचा ताण कमी होईल.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

 


Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० ऑगस्ट २०२६ साठी हवामान अंदाज व कृषी हवामान सल्ला