छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १९ ते २३ जुलै २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ
राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.०
ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष
आर्द्रता ४८ ते ८१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १७ किमी/तास राहण्याची
शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात दि. १८ जुलै २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या
कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त
(३० ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. २३ ते २९ जुलै २०२५ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील.
तसेच पर्जन्यमान,कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे
राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
ऊस
बेणेप्रक्रिया व लागवड
आडसाली ऊस
लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५,
व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम
कार्बेनडेझीम आणि डायमेथोएट ३०० मिली प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १०-१५
मिनिट द्रावणात बुडवावे. रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर ऍसिटोबॅक्टर १० किलो +
स्फुरद विरघळणारे जिवाणू २.५ किलो + १ किलो ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक १०० लिटर
पाण्यात द्रावण करून त्यामध्ये १५-२० मिनिटे बेणे बुडवुन ठेवावे व त्यानंतर लागवड
करावी.
कापूस
वाढीची अवस्था
मागील
आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) प्रादूर्भाव
दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ८ ते १० पिवळे व निळे चिकट सापळे प्रति एकर
प्रमाणात लावावेत. तसेच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त
असल्यास ॲसीटामिप्रीड २० टक्के ३० ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के ४० ग्रॅम किंवा फलोनिकॅनीड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच कापुस पिकामध्ये लागवडीच्या वेळी खताची पहिली मात्रा दिली नसल्यास, ६०:६०:६०
किलो नत्र, स्फुरद
व पालाश प्रति हेक्टर आळे पद्धतीने किंवा पेरून द्यावा.
मका
वाढीची अवस्था
मका
पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता असल्यास तण
नियंत्रणासाठी पीक २५ ते ३० दिवसाचे झाले असल्यास हॅलोसल्फुरॉन मिथाइल ७५ टक्के
डब्ल्यूजी २.४ ग्रॅम किंवा टेम्बोट्रिओन ३४.४
टक्के एससी ५.७ मिली या तणनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघुन फवारणी करावी. तसेच मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव ओळखन्यासाठी एकरी
२० कामगंध सापळे लावावेत. तसेच प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास व्यवस्थापनासाठी ५
टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तूर
वाढीची अवस्था
तुर
पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता असल्यास तण
नियंत्रणासाठी पीक २० ते २५ दिवसाचे झाले असल्यास इमॅझीथापर ३५ टक्के + इमाझामॉक्स ३५ टक्के २.५ ग्रॅम या तणनाशकांची
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
मूग/उडीद
वाढीची अवस्था
मुग/उडीद
पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. तसेच मागील
ढगाळ वातावरणामुळे मुग/उडीद पिकावर पाने खाना-या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत
असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी ३० मिली किंवा थायोडिकार्ब ७५
डब्ल्यू. पी. १.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात पावसाची
उघाड बघुन फवारणी करावी.
सिताफळ
कळी अवस्था
सिताफळ
बागेत तण व्यवस्थापन करावे. तसेच पिठ्या ढेकूण किटकावर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी
बागेतील सर्व झाडाच्या जमिनीलगत बुडावर चिकट बँड किंवा प्लास्टिकच्या टेपचा वापर
करावा व प्लास्टिक टॅपवर चिकट वंगण (ग्रीस) पसरवावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील
आठवड्यातील रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मिरची पिकावरील रस शोषण करणा-या
(फुलकीडे,मावा)
किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के
एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
मावा या विषाणूजन्य आजारापासुन शेळया व मेंढयाचे संरक्षण करण्याकरीता त्याच्या
तोंड व ओठांवरील जखमा सकाळी व सायंकाळी पोटॅशियम परमॅग्नेटने धुवून साफ कराव्यात व
जखमांवर हळद, लोणी
किंवा दुधाची साय यासारखे मऊ पदार्थ लावावेत. यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात. तसेच
खादयामध्ये मऊ, लुसलुसीत
चारा, कोथींबीर, मेथी
घास याचा समावेश करावा.
इतर
सर्व
शेतकरी बांधवांकरीता त्यांच्या शेतातील पीकांवरील बुरशींचे तसेच पीकातील खत
व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक बुरशीनाशके (बायोमिक्स) व जैविक खते
(बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान केंद्र, पैठण
रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकरीता उपलब्ध आहेत.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.
Comments
Post a Comment